04/05/2024
नमस्कार मंडळी,
कसे आहात सगळे?
आज फार दिवसांनी पोस्ट लिहित आहे. कारणही तसंच आहे. TAIL TALES च्या प्रवासात असंख्य प्राणी पाहुण्यांचा सहवास लाभला. खूप निर्मळ प्रेम मिळालं. पण काही पाहुणे तुमच्या काळजात कायमचं घर करतात. असा माझा एक पाहुणा म्हणजे "हॅलो" नावाचा "पग"! मार्च 2022 मध्ये हॅलो आमच्याकडे trial साठी आला तेव्हा तो 12 वर्षांचा होता. वयोमानामुळे त्याला काही शारिरीक अडचणी होत्या. आणि त्याच्या पालकांना पुढे एप्रिलमध्ये एक महिन्यासाठी त्याला ठेवायचं होतं. त्यापूर्वी त्याच्या 3-4 trials आम्ही घेतल्या. खरं तर त्या त्याच्या trials नसून माझ्याच trials होत्या. कारण एवढ्या मोठ्या काळासाठी प्रथमच कोणी पाहुणा येणार होता आणि तेही वाढलेलं वय, आजार आणि शारिरीक अडचणीमुळे विशेष काळजीची गरज असलेला! कितीही नाही म्हणलं तरी risk होतीच. पण ती risk घ्यायची ठरवली आणि हॅलो आमच्याकडे राहायला आला. छान राहिला आणि महिनाभराने सुखरुप घरी परतला. त्याची आई जेव्हा त्याला घ्यायला आली तेव्हा मला समजलं की हॅलो हा आपल्या सर्वांचे दैवत,महाराष्ट्रभूषण ,शिवशाहीर कै. श्री बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरातील असून त्यांचा फार लाडका होता. त्यांच्या सूनबाई सोनाली पुरंदरे हॅलोला घेऊन आमच्याकडे आल्या होत्या पण मी ओळखू शकले नाही. पुढेही वर्षभर अधून मधून हॅलो येत राहिला. मागच्या मे महिन्यात 6-8मे त्याचा स्टे ठरला. पण त्या आधीच 4मे ला हॅलो 2-3दिवसाचं आजाराचं निमित्त होऊन देवाघरी गेला. आज हॅलोचा स्मृतीदिन आहे. आमच्या अल्प सहवासाच्या अनेक आठवणी मनात दाटल्या आहेत. त्याच्याबरोबर खेळ,पळापळी, दंगा असं काहीच नव्हतं. पण एका शरीराने थकल्या व काहीसं परावलंबित्व आलेल्या जिवाला आपल्याबरोबर आश्वासक वाटतं यापेक्षा मोठा आनंद तो काय!
हॅलो, तुझ्यासारख्या निर्मळ जिवाला नक्कीच सद्गती मिळाली असणार आहे. तू कायम आमच्या आठवणींमध्ये अमर राहशील. सुखात रहा!
पुन्हा लवकरच भेटुया मंडळी!
तोपर्यंत Live and Let Live! Stay PAWsitive!!
TAIL TALES