16/09/2023
*आठवणीतील अविस्मरणीय दिवस ..........*
*वन सुरक्षा दल/ वन संरक्षण पथक:-*
वर्ष २०१४-१५ मध्ये महाराष्ट्र वनविभागात सर्वप्रथम वर्दीधारी वन संरक्षण पथक/ वन सुरक्षा दल बोरगाव (गोंडी) या गावात स्थापन करून एक नविन पायंडा घालुन दिला :-
माझी वर्ष २०१३-१४ मध्ये नागपुर वनविभागातुन वर्धा वनविभागात आपसी बदली झाल्यानंतर मी खरांगणा वनपरिक्षेत्रातील बोरगाव गोंडी बिटाचा व JFM समिती,बोरगाव (गोंडी) चा पदभार स्विकारला. बोर व्याघ्र प्रकल्पाचे सिमेवर असलेल्या बोरगाव (गोंडी) गावात माझे मुख्यालय असल्याने मी सहकुटूंब तेथे राहण्यासाठी गेलो. 166 घरांची वस्ती असलेल्या ह्या गावातील बहुतांश घरे कच्चे व अर्धे कच्चे होते. गोंड, गोवारी, कलार, इत्यादी प्रमुख जाती असलेल्या ह्या गावात ९० टक्के पेक्षा जास्त लोक गोंड जातीचे आदीवासी बांधव होते. सन २०११ च्या जनगणेनुसार या गावाची एकुण लोकसंख्या ७८६ होती. लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व पशुपालन होता. हे गाव जंगलालगत असल्याने वनक्षेत्रातुन तेंदूपत्ता, मोहफुले, चारोळी, टेंभरूण, मध इत्यादी गौण वनोपजाचे संकलन करून येथिल आदीवासी बांधव आपला उर्देनिर्वाह भागवित होते. बहुतांश शेती जंगलालगत असल्याने रोही, सांबर, चितळ, काळविट, रानडुक्कर इत्यादी वन्यप्राण्यामार्फत शेतपिकाचे अतोनात नुकसानी होत असे तसेच बहुतांश शेतजमिन मुरमाडी व गोटाडी असल्याने शेतीमधुन उत्पन्न नाममात्र मिळत होते, त्यामुळे अनेक शेतकरी त्यांची शेती पडीत ठेवुन भेटेल ते काम करीत होते, तर कांही लोक गाव-परगावातील सदन कास्तकारांचे शेतात शेतमजुरीस जात होते. वाढत्या बेरोजगारीमुळे कांही लोक व्यसनाधिन सुध्दा झाले होते. वन्यप्राण्यांचे शिकारी करणे, जंगलातुन सागवान लाकडे तोडुन त्याची विक्री करण्याचा धंदा कांही व्यक्तींनी सुरू केल्याचे कुजबुज सुध्दा सदर काळात ऐकायास मिळत होती. हे सर्व वेळीच जर थांबवले नाही, तर गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत जाईल आणि जंगलाचे अतोनात नुकसान होईल या जाणीवेपोटी मी वनक्षेत्रात कामे काढुन रोजगार निर्मिती करण्याचे ठरविले. त्यानंतर अनघड दगडी बांध, रोपवन, सलग समतळ चर, रोपवाटिका इत्यादी कामे मंजुर करून आणुन गावातील अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळुन दिला. तसेच सदर गावात गावविकासात्मक अनेक नाविण्यपुर्ण कामे सुध्दा केली-
१)गावातील महिलांचे मदतीने दारूबंदी मोहीम राबवुन गावातील दारूबंदी केली. व्यसनमुक्ती अभियान राबवुन दारू, तंबाकू, बिडी, सिगारेट, गांजा, गुटखा इत्यादी व्यसन सोडणा-यां व्यक्तींचे विविध कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सत्कार घेतले.
२)गावातील मुलाच्या कला-गुणांना वाव मिळावा म्हणुन गावात अनेकदा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. गुणवान विद्याथ्यांचे वन अधिका-यांचे हस्ते सत्कार करून त्यांना प्रमाणपत्र व मोमेंटो वितरीत केले. मुलांचे मोफत ट्युशन घेतले.
३) गावात कबड्डी खेळण्यासाठी मैदान तयार करून कबड्डी टीमला किट वाटप केले आणि त्यांना विविध ठिकाणी कबड्डी सामने खेळण्यासाठी नेले.
४) गावात स्वच्छता अभियान राबवुन सांडपाणी व्यवस्थापनासाठी ठिक-ठिकाणी श्रमदानातुन शोषखड्डे खोदले. गावास घाणीपासुन मुक्त करून सुंदर गाव बनविले.
असे अनेक गाव विकासात्मक अभियान राबवुन त्या गावची वाटचाल आदर्श गावाकडे करीत असतांना मला एका टीमची आवश्यक्ता भासू लागली, तेंव्हा माझ्या मनात एक विचार आला की, वनविषयक कार्यात माझ्या मदतीसाठी पोलीस विभागाच्या धर्तीवर "ग्राम सुरक्षा दल" सारखे स्वयंप्रेरणेने काम करणारे एखादी स्वयंसेवकांची टीम तयार करावी. त्यानंतर सदर संकल्पनेबाबत वरिष्ठांशी चर्चा केली आणि वर्षे २०१४-१५ मध्ये " वनविभागात प्रथमच स्वयंसेवक भावनेतुन काम करणारे १५ मुलांचे वन सुरक्षा दल/ वन संरक्षण पथक स्थापन केले. सदर पथकातील १५ मुलांसाठी वरीष्ठांच्या परवानगी संयुक्त वनव्यवस्थापन समिती,बोरगाव (गोंडी) चे बँक खात्यातील व्याजाचे रक्कमेतुन कॉम्बँक्ट ड्रेस, DMS बुट, साधी कँप, लाठी इत्यादी साहीत्याची खरेदी केले. वनसंरक्षण पथकातील बोरगाव गोंडी येथिल १८ ते ३० वयोगटातील १५ मुलांना दररोज सकाळी शारिरीक कवायत व ड्रिल चे प्राथमिक प्रशिक्षण देवुन त्यांना वन संरक्षण पथक स्थापन करण्याबाबतचे उद्दिष्ठ व पथकाचे कार्य समजावुन सांगितले व युनिफार्मचा पुरवठा केला. त्यानंतर त्यांचे सहकार्याने अनेक उल्लेखनिय कामे पार पाडली :-
१) वन संरक्षण पथकाचे सहकार्याने वनक्षेत्रात नियमित गस्ती करून अवैध वृक्षतोडी, अवैध शिकारी, अवैध उत्खनन, अवैध वनोपज वाहतुक, अवैध अंगारी, अतिक्रमण इत्यादी अवैध कृत्यावर आळा बसविला. वनगुन्हयांच्या तपासात पथकाचे सहकार्य घेवुन आरोपींना गजाआड केले. पथकाचे मदतीने वर्षे २०१४-१५ ते २०१९-२० या वर्षात बोरगाव बिटातील वनक्षेत्रास अंगार लागू दिली नाही. तसेच इतर बिटातील वनक्षेत्रात लागलेल्या अंगारी तातडीने विझवुन वन व वन्यजीवांना मोठ्या प्रमाणात होणा-या हानीपासुन वाचविले.
२)पोपट पिंजरा मुक्ती अभियान राबवुन बोरगाव (गोंडी) सहवनक्षेत्रातील बोरगाव, सुसूंद, सहेली, डबलीपुर तसेच मासोद या गावात जनजागृतीपर रँली काढुन लोकांना पोपट पाळण्यापासुन परावृत्त केले व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील शिक्षेची जाणीव करून दिली. त्यानंतर शोध मोहिम राबवुन प्रत्येक घर तपासुन लोकांकडुन पोपटे ताब्यात घेतले. सदर पोपटांना छोट्या पिंज-यात ठेवुन पाळलेले असल्याने त्यांना उडता येत नव्हते, त्यामुळे त्यांना पिपल फॉर अँनिमल, वर्धा येथिल करूणाश्रमात नेवुन ठेवुन पोपटे उडण्यास सक्षम झाल्यानंतर त्यांना निसर्गमुक्त केेले.
३) वन संरक्षण पथकाचे मदतीने विहिरीत पडलेले, कुंपनात अडकलेले, अपघातात जख्मी झालेले, मानव वस्तीत घुसलेल्या रोही, माकड, काळविट, मोर, सांबर इत्यादी वन्यप्राण्याचे रेक्यू करून त्यांना उपचारानंतर नैसर्गिक अधिवासात सोडले.
४) वन संरक्षण पथकाचे सहकार्याने वनक्षेत्रातील अतिक्रमण काढुन त्याठिकाणी क्षमदानातुन खड्डे खोदुन औषधी वनस्पतीचे रोपे लावली.
५) वन संरक्षण पथकाचे सहकार्याने बोरगाव गोंडी बिटाचे वनक्षेत्रात श्रमदानातुन कृत्रिम पाणवठे तयार करून दर उन्हाळ्यात त्यात नियमित पाणी भरून वन्यप्राण्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. सदर पाणवठ्यांवर मांसभक्षी, तृणभक्षी वन्यप्राण्यांसह अनेक पक्षांनी हजेरी लावुन त्यांची तृष्णा भागविलेली होती.
६) बोरगाव गोंडी नियतक्षेत्रात मोठ्या प्रमाणात आढळणा-या राखी धनेश (Grey Horn-bill ) पक्षांचे संवर्धनासाठी ५० लाकडी ढोल्या तयार करून वनक्षेत्रात विविध ठिकाणी झाडांवर बांधल्या. सदर कृत्रिम ढोलीत हार्नबिलसह निलपंख, साळुंखी, ब्राम्ही मैना इत्यादी पक्षांनी अंडे देवु पिल्ले काढल्याचे आढळुन आले. या मोहिमेत पिपल फॉर अँनिमल,वर्धा टीमचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.
७) वाघ-वाघीन मिलन काळात व पिल्ले लहान असतांना बोरगाव गोंडी व सुसूंद शिवारात व जंगलात वास्तव्यास येणा-या वाघ व वाघीनीचे संनियंत्रण करून मावन-वन्यजीव संघर्ष टाळण्याचे अत्यंत मोलाची कामगीरी वन संरक्षण पथकाचे सहकार्याने पार पाडली.
८) सुसूंद गावापासुन शुन्य मिटर अंतरावर असलेल्या श्री.रविंद्र धामंदे यांच्या शेतातील ओलीताखाली असलेल्या कापसाचे पिकात नर-मादी असे २ वाघ माहे मार्च २०१८ ते जुन २०१८ अखेर पर्यंत वास्तव्यास होते. या दरम्यान वन संरक्षण पथकातील सदस्यांचे अथक परिश्रमामुळे कोणत्याही प्रकारचे मनुष्यहानी बाबतचे प्रकार घडले नाही किंवा वाघांना सुध्दा कोणतीही हानी पोहचली नाही. जवळपास ४ महिन्यापर्यंत सदर २ वाघ सुसूंद गावालगत व्यास्तव्यास असतांना ते गावालगच्या इतर शेतांमध्ये सुध्दा भ्रमंती करून गुरे-ढोरे ,बक-या व कुत्र्यांचे शिकारी करीत होते. एवढे कालावधीनंतरही वाघ जंगलाकडे जात नसल्यामुळे लोकांचा रोष वाढत होता, शेतात काम करणा-या शेतकरी व शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते, लोकांना शेतीचे कामे करतांना संरक्षण द्यावे लागत होते. त्यामुळे सदर वाघांना जंगलाचे दिशेने हाकलत नेण्याचे निर्णय घेण्यात आले. ह्या वाघांना बोर अभयारण्याचे जंगलापर्यंत हाकलत नेतांना या वन संरक्षण पथकाने महत्वांची भुमिका बजावलेली होती.
९) वन संरक्षण पथक बोरगाव गोंडी चे सहकार्याने विविध गावात व शाळेत जावुन मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी करावयाचे उपाययोजनाबाबतचे सभा व कार्यक्रम घेवुन जनजागृती केली. वन्यप्राण्यापासुन शेतपिकाचे नुकसानी टाळण्यासाठी करावयाचे उपाययोजना बाबत अनेक प्रात्यक्षिक करून दाखविले. त्याचा उपयोग अनेक शेतक-यांनी शेतपिकनुकसानीत करून फायदा घेतल्याचे आढळुन आले.
याशिवाय सन २०१४-१५ च्या "संत तुकाराम वनग्राम राज्य स्तरीय योजनेत "संयुक्त वन व्यवस्थापन समिती, बोरगाव (गोंडी) राज्यातुन प्रथम क्रमांक पटकाविण्यात "वन संरक्षण पथक" बोरगाव (गोंडी) चा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर कांही वर्षांनी वनविभागामार्फत व्याघ्र प्रकल्पाचे लगतच्या गावांमध्ये "व्याघ्र मित्र मंडळ" व PRT (Primary Responce Team) तयार करण्यात आले. तसेच वन्यप्राण्यांचे बचावासाठी कर्मचा-यांतुन ईच्छुक कर्मचारी निवडुन RRU ( Rapid Responce Unit शिघ्र कृती दल), RRT ( Rapid Rescue Team,जलद बचाव गट) तयार करण्यात आले असता वर्ष २०१९ मध्ये RRT चा मी पण सदस्य बनुन अनेक वन्यजीवांचे बचाव केले.
मी वर्ष २०१४ मध्ये स्थापण केलेल्या "वन संरक्षण पथक" बोरगाव (गोंडी) मुळेच मला आणि माझ्या JFM समितीस "सुवर्ण पदक" विजेता बनविलेले होते, हे यावेळी आपणास विशेष करून सांगावसे वाटते. निस्वार्थ भुमिकेतुन वर्ष २०१४ ते २०१९ पर्यंत माझ्यासोबत काम केलेल्या "वन संरक्षण पथक" बोरगाव (गोंडी) मधील सर्व स्वयंसेवकांना, गुरूदेव सेवा मंडळ ,समस्थ ग्रामस्थ व माझे सहकारी क्षेत्रीय कर्मचारी यांना माझा मानाचा मुजरा ..........🙏🙏🙏
तसेच सदर कालावधीत माझ्या पाठीमागे खंबीरपणे ऊभे राहुन मला प्रोत्साहन दिलेल्या आदरणीय श्री.मुकेश गणत्रा सर व श्री.दिगांबर पगार सर तत्कालीन उपवनसंरक्षक,वर्धा, श्री.वाघमारे सर ,श्री.सुहास बढेकर व कु.निकिता चौरे मँडम तत्कालीन सहाय्यक वनसंरक्षक,वर्धा, श्री.देवराव ताले सर, श्री.तळनीकर सर, श्री.गजानन बोबडे सर व श्री.अभय ताल्हन सर तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी,खरांगणा, श्री.दिनकर पाटील सर व श्री.अवधुत डेहनकर सर तत्कालीन क्षेत्र सहाय्यक, बोरगाव गोंडी या सर्वांचे सुध्दा मनापासुन आभार..🙏🙏. ...................आपल्या मार्गदर्शनामुळेच मी सदर कालावधीत नाविण्यपुर्ण योजनांची अमलबजावणी करू शकलो.........🙏🙏
आपलाच
मनेशकुमार सज्जन, वनरक्षक