07/11/2017
लेट्युस हा युरोपियन सॅलेडचा प्रकार आहे. फिकट हिरव्या रंगाचा कोबीसारखा याचा गड्डा असतो. परंतु, हा गड्डा होऊ दिला जात नाही. या भाजी पिकाचे शास्त्रीय नाव ‘लेट्युका सटायव्हा’ आहे. ही भारतातील महत्त्वाची हिवाळी हंगामात येणारी भाजी आहे. भारतातील बहुतेक राज्यांतून मोठ्या शहराच्या परिसरात मर्यादित क्षेत्रात त्याची लागवड केली जाते. उत्तर भारतातील पट्टे, आसाम, बंगळूर,
लेट्युस हा युरोपियन सॅलेडचा प्रकार आहे. फिकट हिरव्या रंगाचा कोबीसारखा याचा गड्डा असतो. परंतु, हा गड्डा होऊ दिला जात नाही. या भाजी पिकाचे शास्त्रीय नाव ‘लेट्युका सटायव्हा’ आहे. ही भारतातील महत्त्वाची हिवाळी हंगामात येणारी भाजी आहे. भारतातील बहुतेक राज्यांतून मोठ्या शहराच्या परिसरात मर्यादित क्षेत्रात त्याची लागवड केली जाते. उत्तर भारतातील पट्टे, आसाम, बंगळूर, हैद्रराबाद, सूरत, अहमदाबाद तर महाराष्ट्रात सातारा, सांगली, पुणे, नगर आणि नाशिक आदी भागांमध्ये प्रामुख्याने या भाजीची लागवड होते. जगात चीन, अमेरिका, स्पेन, इराण, जपान, तुर्कस्थान, मेक्सिको, इटली, जर्मनी आदी देशांत हे पीक घेतले जाते. जगात लेट्युसचे उत्पादन खुल्या शेतात तसेच हरितगृहात गादी वाफ्यावर घेतले जाते. ‘हायड्रोपोनिक्स’ पद्धतीनेही मोठ्या प्रमाणावर लेट्युसचे उत्पादन घेण्याचा कल वाढला आहे.
भारतातील परिस्थिती :
भारतात वा महाराष्ट्रात हे पीक वर्षभर घेता येते व उत्तम प्रतीचे गड्डे मिळतात. पारंपरिक लागवड पद्धतीमध्येही उच्च तंत्रज्ञान वापरून कडक उन्हाळ्याचे दोन-तीन महिने सोडल्यास वर्षभर लागवड करता येते.
लेट्युस भाजी खाण्याची पद्धत :
जगभरात लेट्युसच्या निरनिराळ्या जातींच्या, प्रकारांच्या पानांचा उपयोग सॅलड म्हणून आहारात करतात. कच्च्या स्वरूपात पाने बारीक चिरून खाल्ली जातात. अथवा ॲस्परागस, झुकिनी या भाज्यांच्या तुकड्यांमध्ये मिसळूनही उपयोग केला जातो. भारतातही आहारात असाच उपयोग केला जातो.
लेट्युसमधील पोषक द्रव्यांचे प्रमाण :
लेट्युसमध्ये फॉस्फरस, सोडियम, गंधक, मॅग्नेशियम आदी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. जीवनसत्त्वे अ, बी-६, क, इ आणि के, प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध तसेच तंतूमय पदार्थ पुरेशा प्रमाणात आढळतात.
लेट्युस भाजीच्या जाती वा प्रकार :
लेट्युसचे बरेच उपप्रकार असून ते असे आहेत.
क्रिस्पहेड किंवा आइसबर्ग
बटरहेड
बिब टाइप किंवा ग्रीन्स
कॉस किंवा रोमेन
स्टेम लेट्युस किंवा सेलेट्युस
क्रिस्पहेड किंवा आइसबर्ग लेट्युस :
हा लेट्युस पूर्वीपासून परदेशात आणि भारतात सर्वांत जास्त प्रमाणात उत्पादनाखालील प्रकार आहे. क्रिस्पहेड किंवा लेट्युस आइसबर्ग म्हणजेच जास्त घट्ट न झालेला कोबीसारखा गड्डा. त्याच्या पानांच्या कडा कुरतडल्यासारख्या असतात.
पाने अतिशय कुरकुरीत, चवीने गोडसर व रसाळ असतात. पाने अतिशय पातळ असतात.
एकंदरीत लेट्युसचा कोणताही प्रकार असो, तो तोंडात टाकल्यावर त्याचा कुरकुरीतपणा अनुभवयाचा! पाने रसाळ असल्यामुळे ती खाताना तोंडातच विरघळतात.
भारतातील स्थानिक बाजारपेठेत आइसबर्ग प्रकारातील गड्ड्यांना मागणी जास्त आहे. भारतात जेथे जेथे परदेशी भाजीपाला लागवडीखाली क्षेत्र आहे तेथे आइसबर्ग लेट्युसची लागवड हमखास असतेच.
बटर हेड लेट्युस :
आइसबर्गच्या खालोखाल या लेट्युसची लागवड केली जाते. या प्रकारात गड्डा तयार होतो; परंतु या गड्ड्यातील पाने जाड, मऊ असून कडा एकसारख्या असतात. पाने कुरकुरीत असून चव गोडसर असली तरी तोंडात टाकल्यावर बटरसारखीच विरघळतात. म्हणूनच या प्रकारच्या लेट्युसला बटरहेड लेट्युस म्हणतात. या गड्ड्यातील पानांची रचना गुलाबाच्या पाकळ्यांच्या प्रकारची असते. या प्रकारात हिरवी लाल तांबूस रंगाची पाने असे दोन उपप्रकार आहेत.
बीब टाइप किंवा ग्रीन्स :
या प्रकारातील जाती आपल्याकडे फारशा लागवडीखाली नसून बाजारपेठेतील मागणीनुसार पिकाचे नियोजन करावे. हा प्रकार म्हणजे बटरहेडसारख्या लेट्युसचा कोवळा गड्डा तयार होत असतानाच तो गड्डा काढला जातो. या गड्ड्यांनाच बिबटाइप लेट्युस म्हणतात.
कॉस किंवा रोमेन :
या प्रकारच्या लेट्युसमध्ये गड्डा तयार होत नाही. परंतू अन्य लेट्युसप्रमाणेच या प्रकारे सुरवातीची वाढ होते. सुरवातीस पाने गुलाबाच्या पाकळ्यांच्या आकारात वाढत असतात. ही पाने चायनीज कोबीप्रमाणे लांब, उभट, रुंद, जाड, कुरकरीत व रसाळ असतात.
स्टेम लेट्युस :
या प्रकारात जमिनीपासून उभट खोड वाढते व त्याला दाटीने पाने येतात. ग्राहकांकडून या प्रकारालाही मागणी असते.
लागवड तंत्रज्ञान :
हवामान : लेट्युस हे पीक थंड हवामानातील आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत या पिकाची चांगली वाढ होते. पानांची प्रत उत्तम असते. १५ अंश सें ते १८ अंश सें. तापमान लेट्युस वाढीसाठी उत्तम असते.
वाढीच्या काळात तापमान २१ ते २६ अंश सेल्सियसवर गेल्यास गड्ड्यावर फुले येवून बी धरण्याचे प्रमाण चालू होते. वाढीच्या काळात तापमान वाढण्यास पानांची चव कडवट होते, तसेच पानांचे शेंडे करपतात. हरितगृहात तापमान व आर्द्रता नियंत्रित करून वर्षभर या पिकाची लागवड करता येते.
जमीन :
भरपूर सेंद्रिय खत असलेल्या, उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या रेताड, गाळवट, पोयट्याच्या जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी चांगल्या असतात. भुसभुशीत मोकळ्या जमिनीत लेट्युसचा गड्डा चांगल्या प्रतीचा व मोठ्या आकाराचा तयार होतो.
लागवडीचे टप्पे : प्रथम जमिनीची उभी-आडवी नांगरट २० ते ३० सेंमी खोलीपर्यंत करून २-३ वेळा कुळवणी करून सर्व ढेकळे फोडावेत. जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळेस एकरी १० ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत टाकून मातीत मिसळून घ्यावे, तसेच शिफारस केलेले कीटकनाशक शिफारस केलेल्या डोसमध्ये मातीत मिसळावे. जमिनीचा सामू ५.८ ते ६.६ पर्यंत असावा.
हरितगृहामध्ये लागवड करावयाची असल्यास शिफारस केल्याप्रमाणे माध्यम (कल्चर) तयार करून ते फॉरमॅलिन रसायन द्रव्याने निर्जंतुक करून घ्यावे. त्यानंतर गादीवाफे लागवडीसाठी तयार करावेत. माध्यम तयार करताना त्यामध्ये एकर क्षेत्राच्या हरितगृहात सूत्रकृमीचे नियंत्रण होण्यासाठी शिफारसीनुसार कडुनिंब पावडर मिसळून घ्यावी.
वाफे तयार करणे :
हरितगृहात वा खुल्या क्षेत्रावरील लागवडीसाठी गादीवाफ्यावरील लागवड फायद्याची ठरते. यामुळे पाण्याचा चांगला निचरा होऊन रोपांची जोमदार वाढ व उत्तम प्रतीचा गड्डा मिळण्यास मदत होते. ६० सेंमी रुंद, ३० सेंमी उंच व सोयीप्रमाणे लांब गादीवाफे तयार करून घ्यावेत. दोन गादी वाफ्यांमध्ये ४० सेंमी अंतर ठेवावे.
बियाणे :
लेट्युसचे बियाणे फारच बारीक असून नाजूक असते. एकरी १३० ग्रॅम बियाणे रोपे तयार करण्यासाठी पुरेसे होते. रोपवाटिकेत ९० सेंमी रुंद, ३० सेंमी उंच व तीन मीटर लांब गादीवाफे तयार करावेत. त्यावर चांगले कुजलेले गाळलेले बारीक शेणखत १० ते १५ किलो टाकावे.
शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर करावा. वाफ्याच्या रुंदीच्या समांतर पाच सेंमी अंतरावर दोन सेंमी खोल अशा रेषा पाडून बियाणे अतिशय पातळ पेरावे. ते बारीक शेणखताने झाकून घ्यावे. त्यानंतर झारीने प्रत्येक वाफ्यास हलके पाणी द्यावे. त्यानंतर वाफे प्लॅस्टिक पेपरने झाकून टाकावेत. बियांची उगवण ५ ते ६ दिवसांत होते. त्यावेळी प्लॅस्टिक पेपर काढून टाकावा.
प्रत्येक वेळी पाणी देतांना पोटॅशियम नायट्रेट अधिक कॅल्शियम नायट्रेट तज्ज्ञांच्या सल्ल्याने द्यावे. कीडी-रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शिफारस केलेल्या कीडनाशकांच्या फवारण्या गरजेनुसार ठरावीक अंतराने कराव्यात. २० ते २५ दिवसांत रोपे पुनर्लागवडीस तयार होतात. प्लॅस्टिक ट्रेमध्ये कोकोपिट माध्यम भरून प्रत्येक कपामध्ये एक बी टोकून वरीलप्रमाणे रोपे तयार केली जातात.
लागवड :
गादीवाफ्यावरील व प्लॅस्टिक ट्रेमधील रोपे २० ते २५ दिवसांची झाल्यानंतर पुनर्लागवड करावी. गादीवाफ्यांवर लागवड करण्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी पाणी द्यावे. दुसऱ्या दिवशी वाफसा आल्यावर पुनर्लागवड दुपारनंतर करावी.
६० सेंमी रुंद तयार केलेल्या गादीवाफ्यावर दोन रोपांमध्ये ३० सेंमी तर दोन ओळींत ४५ सेंमी अंतर ठेवून एका ठिकाणी एकच जोमदार रोप लावून लागवड करावी. एकरी २६ हजार ६६६ रोपांची लागवड होते.
हरितगृहात याच पद्धतीने लागवड करावी.
पारंपारिक लागवड पद्धतीमध्ये लेट्युसची लागवड सपाट वाफ्यात किंवा सरी वरंब्यावर ४५ बाय ४५ सेंमी अंतरावर करावी. या पद्धतीत एकरी १९ हजार ७५० रोपांची लागवड होते.
पाणी व्यवस्थापन :
पिकाची वाढ होण्यासाठी आणि उत्तम प्रतीचे उत्पादन मिळण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे अतिशय गरजेचे आहे. ठिबकद्वारे पाण्यासह विद्राव्य खते रोपवाढीनुसार देता येतात. पिकास दररोज किती लिटर पाण्याची गरज आहे हे निश्चित करून पाणी देण्याचा कार्यक्रम निश्चित करावा.
खत व्यवस्थापन :
हे पीक लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी काढावयास तयार होते. कमी कालावधीचे पीक असल्यामुळे खतांच्या मात्रा पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार देणे आवश्यक आहे. एकरी ४० किलो नत्र, ३० किलो स्फुरद, तर ४० किलो पालाश देण्याची शिफारस करण्यात येते. लागवडीपूर्वी माती परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे खतांच्या नेमक्या मात्रा निश्चित करता येतात.
मल्चिंग पेपरचे आच्छादन :
लागवडीपूर्वी गादीवाफ्यावर प्लॅस्टिक मल्चिंगचे आच्छादन करणे फायद्याचे असते. त्यामुळे तणनियंत्रण, जमिनीलगतचे तापमान नियंत्रित राहणे शिवाय बाष्पीभवन कमी होण्याचे प्रमाण वाढते.
आंतरमशागत :
लेट्युस पिकाची मुळे उथळ असल्यामुळे वेळोवेळी तण काढून हलकी खुरपणी करावी. साधारणतः प्रत्येक १५ दिवसांनी माती खुरप्याने हलवून घ्यावी.
पीक संरक्षण :
लेट्युस पिकावरील महत्त्वाच्या कीडी, रोग व त्यांची पिकावरील लक्षणे यांची माहिती अशी.
कीड नियंत्रण :
मावा :
लक्षणे : पिकावर ही कीड मोठ्या प्रमाणावर आढळून येते. मावा अतिशय लहान आकाराचे व हिरवट रंगाचे असतात. ही कीड पानातील रस शोषून घेते. यामुळे रोपांची वाढ समाधानकारक होत नाही. तसेच या किडी विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात. लागवडीच्या क्षेत्रात २०-२५ ओळीनंतर मोहरीची एक ओळ लावल्यास मोहरीच्या पानांवर मावा कीड आकर्षित होते.
रोग नियंत्रण :
स्लायमी सॉफ्ट रॉट
लक्षणे : प्रथम पानावंर तेलकट फुगीर सडके डाग दिसतात. नंतर हे डाग तपकिरी रंगाचे होऊन सर्वत्र पानांवर पसरतात व बुळबुळीत चिकट दिसतात.
नियंत्रण : नियंत्रणासाठी गड्डा लवकर काढून जमिनीत बेताचा ओलावा ठेवल्यास हा रोग आटोक्यात येतो. जमिनीतून पाण्याचा योग्य निचरा होणे आवश्यक आहे. पिकाची फेरपालट करावी.
बॉटम रॉट :
झाडांच्या जमिनीलागतच्या पानांच्या खालील बाजूस लहान लालसर ते करड्या रंगाचे ठिपके आढळून येतात. ठिपके मुख्य पानाच्या शिरांपर्यंत पसरतात. या ठिपक्यांची जोमदार वाढ होऊन संपूर्ण पान सडण्यास चालू होते.
शिरांमधून करड्या रंगाचा द्रव बाहेर येऊन वाहू लागतो. त्याचप्रमाणे गड्डा चिकट स्वरूपाचा व करड्या रंगाचा होऊन कोसळतो. पानांच्या पेशी लालसर-करड्या रंगाच्या दिसून येतात. उष्ण व दमट हवामानात रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
नियंत्रण : जमिनीच्या भागातून पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणे अत्यावश्यक आहे. खोड व जमिनीलगतच्या पानांना पाणी देताना स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. शिफारस केलेल्या बुरशीनाशकांच्या फवारण्या ठरावीक दिवसांच्या अंतराने गरजेनुसार कराव्यात. उष्ण व दमट हवामान पिकामध्ये स्वीट कॉर्नची मधून-मधून सोबत झाड म्हणून लागवड करावी. या झाडांच्या सावलीमुळे रोगाचे नियंत्रण होण्यास मदत होते.
भुरी (पावडरी मिलड्यू) :
हा रोग उष्ण आणि दमट हवामानात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. रोगाची लक्षणे प्रथम जून झालेल्या पानांवर दिसून येतात. पानांवर ठिपके आढळून येतात. कालांतराने हे ठिपके आकाराने वाढून पानांच्या दोन्ही बाजूस व गड्ड्यावर दिसून येतात. रोगाची तीव्रता जास्त असल्यास पाने निस्तेज होऊन गळून पडतात. पानांच्या भागावर पांढरी पावडरसारखी बुरशी आढळून येते.
केवडा (डाउनी मिलड्यू) :
लक्षणे : या रोगामुळे पानांच्या पृष्ठभागावर फिकट हिरव्या किंवा पिवळसर रंगाचे चट्टे दिसतात. पानांच्या खालच्या बाजूवर केवड्यासारखी पांढरी वाढ झालेली दिसते. नंतर अशी पाने पिवळी पडून वाळून जातात.
रोगप्रतिकारक जातींच्या लागवडीमुळे रोगाला प्रतिबंध केला जातो.
मोझॅक व्हायरस :
हा विषाणूजन्य रोग रोपवाटिकेत रोपांवर दिसून येतो. पानांच्या कडा किंचित आतील बाजूस वळलेल्या असतात. पानांवर पिवळे चट्टे दिसतात. लागवड केल्यानंतरही मोठ्या पानांवर हा रोग दिसून येतो. पिवळसर रंगाचे चट्टे पानांच्या शिरांमधील भागांत आढळून येतात. कालांतराने पाने पिवळी पडून प्रादुर्भाव झालेली दिसतात. अशी झाडे उपटून नष्ट करावीत.
लेट्युस गड्ड्यातील विकृती :
टिपबर्न :
लक्षणे : या विकृतीमुळे पिकाचे खूपच नुकसान होते. ही विकृती गड्ड्यातील अंतर्गत पानांच्या वरच्या बाजूस तसेच गड्डा झाकलेल्या पानांवर आढळून येते. प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास संपूर्ण गड्ड्यातील पाने सडू लागतात आणि गड्डा विक्रीस अयोग्य होतो. या विकृतीचा प्रादुर्भाव गड्डा काढणीच्या अवस्थेत आढळून येतो.
जमिनीचे तापमान आणि हवेतील तापमानामध्ये जेव्हा जास्त फरक असतो तेव्हा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. कॅल्शियमची कमतरता असल्यास ही विकृती दिसून येते. जमिनीचा सामू ५.५च्या खाली (आम्ल धर्मी) असल्यासही प्रादुर्भाव आढळतो.
नियंत्रण : या विकृतीच्या नियंत्रणासाठी पाणी अतिशय काळजीपूर्वक द्यावे. विकृतीला प्रतिकारक जातींची लागवडीसाठी निवड करावी. लागवडीआधी माती परीक्षणाच्या अहवालानुसार कॅल्शियम क्लोराइड एकरी १० किलो द्यावे. जमिनीचा सामू ५.५ ते ६.५ च्या दरम्यान असावा.
पीक काढणी :
नुसत्या पानांच्या (लिफलेट्यूस) जातीच्या लेट्युसची काढणी पाने कोवळी असतानाच करावी.
गड्डा लेट्युसची काढणी गड्डा पूर्ण तयार झाल्यावर करतात. गड्डा काढतांना जमिनीच्या थोडे खाली धारदार चाकूने कापून काढतात. अंदाजे ४५० ते ५०० ग्रॅम वजनाच्या गड्ड्यांची काढणी करावी. एकरी १२ ते १३ टन विक्रीलायक गड्डे मिळतात. गड्ड्यांवर सकाळी दव आढळून आल्यास दवाचे प्रमाण कमी झाल्यावर काढणी करावी.
पॅकिंग :
लेट्युसचे गड्डे पॅकिंग शेडमध्ये आणून आकार, वजनांप्रमाणे त्यांची प्रतवारी करावी. वायुविजनासाठी असलेल्या छिद्रांच्या कोरूगेटेड बॉक्सेसमध्ये दोन डझन गड्डे दोन थरांमध्ये पॅक करून बाजारपेठेत पाठविता येतात.
बॉक्सेसमध्ये गड्डे भरताना बॉक्सेसच्या तळाकडील भागात गड्ड्यांच्या खोडाकडील बाजू ठेवावी, तर दुसरा भाग भरण्याच्या वेळी पहिल्या थरावर गड्ड्याची वरची बाजू ठेवावी व पॅकिंग करावे. यामुळे मालाला वाहतुकीमध्ये इजा होणार नाही.
प्री कूलिंग व कोल्ड स्टोरेज :
पूर्व शीतकरण (प्री कूलिंग) व शीतगृह (कोल्ड स्टोरेज) यांची सुविधा असल्यास उत्तम. अशा ठिकाणी गड्ड्यांची प्रतवारी व पॅकिंग केल्यावर बॉक्सेस पूर्व शीतकरण करण्यासाठी शून्य ते दोन अंश से. तापमान व ८० ते ९० टक्के सापेक्ष आर्द्रतेत ठेवावेत. शीतगृहात लेट्युसचे गड्डे तीन ते चार आठवड्यांपर्यंत शून्य अंश से. तापमान आणि ९० ते ९५ टक्के सापेक्ष आर्द्रतेमध्ये साठवून ठेवता येतात.
संपर्क : डॉ. अरूण नाफडे, ९८२२२६११३२
(लेखक पुणेस्थित उद्यानविद्या तज्ज्ञ आहेत)