07/07/2023
काल (06/07/2023) संध्याकाळी 06.03 मिनिटांनी आवरे गावातून समाधान म्हात्रे ग्रा.सदस्य (पाले) यांचा कॉल आला,की आवरे गावात भटक्या कुत्र्यांनी जखमी केलेल एक भेकर (Barking Deer) संजय गावंड यांच्या घरात आश्रयाला आलं आहे. मी त्यांना सांगितले की याबाबतब कुणाला सांगून तिथे गर्दी वाढवू नका.त्यांनी सांगितले की आम्ही थेट तुम्हालाच कॉल केला आहे व आम्ही त्या जीवाला एका अंधाऱ्या खोलीत ठेवले आहे.या घटनेची खबर उरण चे RFO श्री.कोकरे सरांना दिली. मी, माझा मुलगा प्रथमेश ,राकेश शिंदे,अविनाश गावंड घटनास्थळी पोहोचल्यावर पाहिले असता भेकराच्या उजव्या शिंगाला दुखापत झाली होती, हे प्रथमदर्शनी समजले कारणं त्यातून रक्त वाहत होत.मनुष्य संपर्कात आल्यामुळे तो जीव स्ट्रेस मध्ये येऊ नये म्हणून त्याच्या डोळ्यावर एक कापड टाकून जखमी शिंगावर लिक्विड बेटाडीन लावले.पण नंतर च्या तपासणीत त्याच्या छातीच्या उजव्या बाजूला एक चाव्याची जखम, तसेच मानेवर नखे मारल्याचा खुणा व शेवटी मागच्या डाव्या पायाला सुद्धा चावा घेतल्याचे समजले.तो एक नर भेकर होता.
एवढ्या वर्षांचा वन्यजीवांच्या स्वभावाचा,सहवासाचा अनुभव व त्यातून आलेले काही दुःखद अनुभव..............अनुभव म्हणजे काही जीव वैद्यकीय मदतीच्या प्रतिक्षेत हातातच जीव सोडलेले पाहिलेत,तर काही भीतीमुळे (स्ट्रेस) हातातच मेलेले आहेत.
गतवर्षी(08/06/2022 )केळवणे गावात कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेले भेकर माझ्या घरी आणलं गेलं, डॉ.चा इलाज चालू असतानाच हार्ट अटॅक ने माझ्या डोळ्यासमोर मृत झाले. या भेकराच्या बाबतीत तस होऊ नये म्हणून काळजी वाटत होती. पुण्याला ट्रीटमेंट साठी पाठवायचं झालं तर गाड्यांचे हॉर्न,अडीच ते 3 तासांचा प्रवास यात काहीही होऊ शकतं. ..........म्हणून कोकरे सरांच्या मार्गदर्शनानुसार त्याच्या जखमांवर इलाज करून त्याच्या अधिवासात सोडायचा निर्णय घेतला.वेळ वाया न घालवता आम्ही आवरे गावचं जंगल गाठलं,एका ठिकाणी भेकराला ठेवून आम्ही सर्वजण तिथून बाजूला झालो.अर्धा तास,एक तास होत आला तरी ते भेकर पळून जायचा प्रयत्न करत नव्हतं,अंधार पडायला लागला होता,पाऊस ही वाढला होता,शिवाय 2 कुत्रे तिकडून येताना दिसले म्हणून त्याला उचलून एका घराचा आसरा घेतला.कोकरे सरांना कॉल करून सर्व प्रकार सांगितला.सरांनी Resq (पुणे)शी संपर्क साधून पुढील उपचाराची व्यवस्था केली.resq टीमशी मी सुद्धा संपर्क साधून इतिप्रकार सांगितला.फोर व्हीलर च्या मागच्या सीटवर भेकराला ठेऊन मी त्याच्या बाजूला बसलो होतो,मुलाला सांगितले की गाडी सावकाश चालव पण हॉर्न वाजवू नकोस.घरी आणल्यानंतर एक अंधाऱ्या खोलीत ठेवून ती खोली बंद केली.resq ची टीम यायला कमीतकमी अडीच ते 3 तास लागणार होते.10-15 मिनिटांनी त्याच्या हालचाली वर लक्ष ठेवून होतो.10.57 ला resq टीम आली ,त्यांनी तपासलं, काही इंजेक्शन दिली आणि एका केज मध्ये सुरक्षितरित्या ठेवून घेऊन गेले.
बाप्पाकडे एकच प्रार्थना की तो जीव सुखरूप resq ला पोहोचू दे आणि पूर्ण बरा होऊन लवकर त्याच्या आधीवासात त्याच्या जोडीदारासोबत राहू दे.
तळटीप:- लोकांमध्ये वन्यजीवांबद्दल जागरूकता येतेय ही मनाला सुखावणारी बाब आहे. आवरे गावचे नागरिक श्री.संजय गावंड,ग्रा.सदस्य समाधान म्हात्रे (पाले), जयवंत ठाकूर (आवरे गाव) या निसर्गप्रेमी नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे आज वन्यजीव रक्षणासाठी आमच्या कामाला बळकटी आली.
श्री.कोकरे सरांचे विशेष आभार🙏🏻🙏🏻 वन्यजीवांच्या उपचारासाठी ते नेहमी quick action घेऊन मदत करत असतात.
या सर्वांचे आभार🙏🏻.
#फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था ,चिरनेर,ता.उरण,जि. रायगड. #
हेल्पलाईन--9594969747