20/05/2024
Wishing you a happy World Honeybee Day 2024!
बाग तयार केली असेल किंवा अजून करायची असेल आणि आपल्या बागेमध्ये मधमाश्या याव्यात असे वाटत असेल तर काय काळजी घ्यावी लागेल? कोणत्या वनस्पती लावाव्यात? याकरता बी बास्केट वेबसाईटवरील 'मधमाशी पूरक वनस्पती व मधमाशांकरता घ्यावयाची काळजी' हा मराठी ब्लॉग बघावा.
आपल्या बागेमध्ये मधमाश्या येऊन त्या तिथे दीर्घकाळ टिकाव्यात यासाठी घ्यावयाची काळजी पुढीलप्रमाणे:-
(१) गच्चीत बाग करायची असल्यास मोठ्या आकाराच्या वृक्षांची कलमे (उदा.आंबा, शेवगा) करून ती ड्रम किंवा मोठ्या कुंडीत लावता येतात.
(२) बागेत वर्षभर फुले येऊ शकतील अशा वेगवेगळ्या वनस्पतींची निवड करून लागवड करावी.
(३) बागेत रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर न केल्यास मधमाश्या आणि मित्र कीटक आपोआप येतात. त्यामुळे जैविक खते व औषधे यांचा जास्तीतजास्त वापर करावा.
(४) मधमाश्यांकरता बागेतील वाफ्यात एका मातीच्या भांड्यात स्वच्छ धुतलेले दगड टाकून मग त्यात स्वच्छ पाणी ठेवावे.
(५) मधमाश्यांनी बागेत पोळे केले असल्यास आपल्या बागेत व आसपास उत्तम जीवविविधता आहे याचे ते द्योतक समजावे. त्या मधमाश्यांमुळे पर-परागीभवन घडून चांगल्या प्रतीची फळे-पिके मिळतील याचा आनंद मानावा.
(६) त्या नैसर्गिक अधिवासातील पोळ्यास हात लावू नये व त्याच्याजवळ पण जाऊ नये. कारण कामकरी माशा पोळ्याचे रक्षण करण्याकरता कायम सतर्क असतात व त्यांच्या हद्दीत गेल्यास त्या आपल्यावर हल्ला करण्याची शक्यता असते.
(७) बागेमध्ये मधुपेटी ठेवलेली असल्यास त्याची योग्य कालांतराने हाताळणी करून निगा राखावी.
© प्रिया फुलंब्रीकर
(टीम बी बास्केट)
फोटो सौजन्य : श्री.मिलिंद गिरीधारी, प्रिया फुलंब्रीकर